मुक्ताईनगरमध्ये महावितरणचा ‘अंधेरनगरी’ कारभार; कोट्यवधींच्या बनावट केबलचा ‘मलिदा’ कोणाच्या खिशात?
किरकोळ वाऱ्यानेही बत्ती गुल; परीक्षा काळात विद्यार्थी घामाघूम, लोकप्रतिनिधींनी धरले मौन!
मुक्ताईनगर (प्रतिनिधी):
भीषण उन्हाळा आणि शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा काळ सुरू असतानाच, मुक्ताईनगर शहरात महावितरणच्या (MSEB) निष्क्रियतेचा आणि भ्रष्ट कारभाराचा उग्र नमुना पाहायला मिळत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून टाकण्यात आलेल्या अंडरग्राउंड केबलिंगच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त होत असून, किरकोळ हवेच्या झुळुकीनेही तासनतास वीज गायब होत असल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे.
बनावट कामाचा फटका नागरिकांना
शहरात ‘बनावट’ दर्जाच्या केबल अंडरग्राउंड करून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्वतःचे खिसे भरल्याची चर्चा आता चव्हाट्यावर आली आहे. अजून पावसाळा किंवा अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला नसताना, केवळ १ आणि २ एप्रिल रोजी सुटलेल्या किरकोळ वाऱ्यामुळे शहरातील वीज पुरवठा पूर्णपणे कोलमडला. उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण असतानाच, तासनतास ‘बत्ती गुल’ होत असल्याने महावितरणच्या कामाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ
सध्या बोर्डाच्या आणि इतर शालेय परीक्षा सुरू आहेत. रात्रीच्या वेळी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंधारात बसावे लागत आहे, तर दिवसा उकाड्यामुळे त्यांची एकाग्रता भंग पावत आहे. कामचुकार अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. या गंभीर प्रश्नावर संबंधित विभागाचे अधिकारी मात्र एसी केबिनमध्ये बसून मूग गिळून गप्प आहेत.
लोकप्रतिनिधींची ‘ब्र’ काढण्याची हिंमत नाही?
सर्वात संतापजनक बाब म्हणजे, जनतेच्या मतांवर निवडून आलेले सर्व सत्ताधारी लोकप्रतिनिधी किंवा विरोधक या भ्रष्ट आणि निष्क्रिय कारभाराविरोधात ब्र शब्दही काढायला तयार नाहीत. महावितरणच्या या मनमानी कारभाराला राजकीय वरदहस्त आहे की काय? असा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारत आहेत.सर्वच लोकप्रतिनिधींच्या या उदासीनतेमुळेच महावितरणचे अधिकारी मुजोर झाले असून, त्यांच्यावर कोणाचाही वचक राहिलेला नाही अशी संतप्त भावना नागरिक व्यक्त करीत आहे.
सहनशक्तीचा अंत होण्याची शक्यता..
किरकोळ वाऱ्यात जर ही अवस्था असेल, तर पावसाळ्यात मुक्ताईनगरकर अंधारातच राहणार का? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. जर वीज पुरवठा सुरळीत होणार का? आणि MSEB च्या भ्रष्ट व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? तर महावितरणच्या भोंगळ कारभार जनतेचा संयम सुटण्याची वाट पाहत आहे का?
“कोट्यवधींचा निधी खर्च करूनही जर नागरिकांना अंधारात राहावे लागत असेल, जर MSEB कड़े केबल फॉल्ट काढण्याची यंत्रणाच नाही तर अंडर ग्राउंड केबल बसवण्याचा अट्टाहास का? करोडो रुपयांचा चुराडा कशासाठी केला जातोय. तसेच शहरांत टाकण्यात आलेल्या बनावट व लो क्वालिटी केबल भ्रष्ट्राचाराची उच्चस्तरीय चौकशी व्हायलाच हवी. हा भ्रष्टाचार नसून सर्वसामान्य जनतेच्या पैशांची लूट आहे!” —
याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट मध्ये कळवा..
#MuktainagarNews #MSEBScam #MaharashtraPowerCut #JalgaonNews #Bhrashtachar #MahaVitaran #MuktaiDoot #BreakingNewsMarathi








