मुक्ताईनगरात विनापरवाना खत विक्रीचा संशय; ‘भूमिविकास ॲग्रो’चे गोदाम सील
जिल्हास्तरीय भरारी पथकाची धडक कारवाई; खतांचे नमुने तपासणीसाठी नाशिकला रवाना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी): तालुक्यातील ‘भूमिविकास ॲग्रो एजन्सी’ येथे जिल्हास्तरीय भरारी पथकाने धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत गोदामामध्ये विनापरवाना खतांचा साठा आढळल्याने खळबळ उडाली असून, पथकाने संबंधित गोदामाला तात्काळ सील ठोकले आहे. या कारवाईमुळे कृषी क्षेत्रात विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
नेमकी घटना काय? जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मुक्ताईनगर येथील भूमिविकास ॲग्रो एजन्सीच्या गोदामाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत असे आढळले की, संबंधित एजन्सीकडे खत विक्रीचा परवाना असला तरी, ज्या गोदामात साठवणूक केली होती, त्या गोदामाचा उल्लेख परवान्यामध्ये समाविष्ट नव्हता. नियमांचे सर्रास उल्लंघन करून या अनधिकृत गोदामात खतांची मोठी साठवणूक केली जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.
अधिकारी पथकाची धडक कारवाई कृषी विकास अधिकारी श्री. पद्मनाभ मस्के आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री. विकास बोरसे यांच्यासह मुक्ताईनगरचे कृषी अधिकारी व गुणवत्ता नियंत्रण अधिकारी सुभाष धायडे यांच्या पथकाने ही धाड टाकली. गोदामातील प्रत्येक साठ्याची बारकाईने तपासणी करण्यात आली.
संशयास्पद खत साठा जप्त तपासणी दरम्यान पथकाला गोदामात ००:५२:३४ W.S. आणि ००:००:५० W.S. या ग्रेडची खते तसेच इतर विविध खतांचा साठा विखुरलेल्या अवस्थेत आढळला. या कारवाईत काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत:
- खतांच्या गोणींवर संबंधित उत्पादक कंपनीचा परवाना क्रमांक नमूद नव्हता.
- उपलब्ध बिलांची तपासणी केली असता, त्यावर खतांचा बॅच नंबर मिळून आला नाही. यामुळे हा सर्व साठा संशयास्पद मानला जात आहे.
नमुने तपासणीसाठी नाशिकला रवाना साठा संशयास्पद आणि नियबाह्य वाटल्याने भरारी पथकाने तातडीने खतांचे नमुने ताब्यात घेतले आहेत. हे नमुने गुणवत्ता तपासणीसाठी खत चाचणी प्रयोगशाळा, नाशिक येथे पाठवण्यात आले आहेत. या खतांची गुणवत्ता सरकारी मानकानुसार आहे की नाही, याचा अहवाल आल्यानंतर संबंधित एजन्सीवर पुढील कठोर कायदेशीर कारवाई निश्चित केली जाणार आहे.
गोदाम सील, चौकशीला वेग संबंधित कंपनीकडे खत विक्रीचा नेमका कायदेशीर परवाना आहे किंवा नाही, याची सखोल चौकशी प्रशासकीय पातळीवर सुरू करण्यात आली आहे. अहवाल येईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून ‘भूमिविकास ॲग्रो एजन्सी’चे गोदाम सील करण्यात आले आहे. भरारी पथकाच्या या धडक कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली असून शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.









