शिरसाळा मारोतीरायाचा ‘महारुद्र’ अवतार; शेंदूर काढल्यामुळे नंदीची पुरातन मूर्ती उजेडात!
On: March 23, 2026 3:11 PM
शिरसाळा मारोतीरायाचा ‘महारुद्र’ अवतार; शेंदूर काढल्यामुळे नंदीची पुरातन मूर्ती उजेडात!
सर्पमित्र समाधान गोसावी यांच्या श्रमदानातून इतिहासाला उजाळा; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण
बोदवड (अमोल व्यवहारे):
राज्यभरात प्रसिद्ध असलेले जागृत देवस्थान श्री.सिद्धेश्वर हनुमान मंदिर, शिरसाळा येथे हनुमान भक्तांसाठी एक अत्यंत सुखद आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाची घटना समोर आली आहे. मुख्य गाभाऱ्यातील हनुमंत रायाच्या मूर्तीसमोरील स्तंभावर वर्षानुवर्षे शेंदूर लावलेल्या अवस्थेत असलेल्या वास्तूविषयी भाविकांच्या मनात नेहमीच कुतूहल होते. अखेर सर्पमित्र समाधान गोसावी यांच्या अथक श्रमदानातून या शेंदुराखालचे मूळ रूप उजेडात आले असून, ती मूर्ती प्रत्यक्ष ‘नंदी’ असल्याची बाब स्पष्ट झाली आहे.
शेकडो वर्षांपासून या मूर्तीवर शेंदुराचे थर साचल्याने तिचे मूळ स्वरूप काळाच्या पडद्याआड गेले होते. समाधान गोसावी यांनी पुढाकार घेऊन हा शेंदूर अत्यंत काळजीपूर्वक काढला. साधारणतः ५ ते ६ किलो शेंदूर काढल्यानंतर महादेवाच्या वाहनाची म्हणजेच नंदीची रेखीव पुरातन मूर्ती प्रकटली. या घटनेमुळे शिरसाळा मारोती मंदिराच्या आध्यात्मिक महत्त्वात मोलाची भर पडली आहे.
तापी-पूर्णा संगमावर शेंदूर विसर्जन
मूर्तीवरून काढण्यात आलेला शेंदूर पुजारी प्रल्हाद नामदेव धनगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र चांगदेव येथे तापी-पूर्णा नद्यांच्या पवित्र संगमावर विसर्जित करण्यात आला. यावेळी राजू धनगर, रामभाऊ पाटील, रमेश बोरसे व अन्य भाविक उपस्थित होते.
महारुद्र अवताराचे दर्शन
प्रभू श्रीराम भक्त हनुमान हे भगवान शिवशंकराचे अकरावे ‘महारुद्र’ अवतार मानले जातात. आता हनुमंत रायासमोर नंदीची मूर्ती उजेडात आल्याने भाविकांना मारोतीरायाच्या या महारुद्र अवताराचे यथार्थ दर्शन घडणार आहे.
ऐतिहासिक संदर्भांची पुष्टी
बोदवड तालुक्यातीलच कुऱ्हा-हरदो येथील ऐतिहासिक बारवेपुढील बजरंग बली मंदिरातही मूर्तीसमोर मोठ्या आकाराचा नंदी आहे. आता शिरसाळा येथेही तशीच रचना समोर आल्याने या परिसरातील प्राचीन मंदिर स्थापत्यशैलीवर नवा प्रकाश पडला आहे. ही बातमी समजताच परिसरातील भाविकांनी नंदीच्या दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती.