‘सेवाकर्मी प्लस’मध्ये जळगाव झेडपीचा डंका; सीईओ मिनल करनवाल यांचा गौरव
मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सन्मान; पारदर्शक प्रशासनावर उमटली मोहोर
जळगाव | राज्य शासनाच्या ‘सेवाकर्मी प्लस’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मिनल करनवाल यांना राज्यस्तरीय विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आदी मान्यवर उपस्थित होते.
का मिळाला पुरस्कार?
प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणणे, कार्यपद्धतीत आधुनिक सुधारणा करणे आणि सर्वसामान्यांना गतीने सेवा उपलब्ध करून देणे, या उद्देशाने राज्य सरकारने ‘सेवाकर्मी प्लस’ उपक्रम राबविला होता. मिनल करनवाल यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हा परिषदेने शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकाभिमुख सेवा वितरणात राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली. या चोख कामगिरीची दखल घेत राज्यस्तरावर हा सन्मान करण्यात आला आहे.
”हा सन्मान जिल्हा परिषदेच्या संपूर्ण टीमच्या सांघिक प्रयत्नांचे यश आहे. यामुळे भविष्यात अधिक सक्षमपणे आणि लोकाभिमुख काम करण्याची नवी ऊर्जा मिळाली आहे.” — मिनल करनवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगाव झेडपी.
या पुरस्कारामुळे जळगाव जिल्ह्याच्या प्रशासकीय कार्यक्षमतेवर राज्यस्तरावर शिक्कामोर्तब झाले असून, जिल्हा परिषद वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.








