खळबळजनक! महामार्गावर ‘रात्रीस खेळ चाले’; तोतया पोलिसांचा सुळसुळाट की खाकीचं अभय?
मुक्ताईनगर (जळगाव): मुंबई-नागपूर महामार्गावर हरताळा गावाजवळ झालेला भीषण अपघात हा केवळ रस्ते अपघाताचा गुन्हा नसून, महामार्गावर सुरू असलेल्या एका मोठ्या गुन्हेगारी रॅकेटचा पर्दाफाश करणारा पुरावा ठरला आहे. दोन नंबर प्लेट्स असलेली कार, आत सापडलेले पोलिसांचे गणवेश आणि लाठ्या यावरून महामार्गावर ‘तोतया’ पोलिसांकडून लूटमार सुरू असल्याचा संशय बळावला असून, या घटनेने राज्याच्या गृहविभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
एकाच कारला दोन नंबर प्लेट्स; गुन्हेगारीचा हायटेक पॅटर्न
हरताळा फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या एर्टिगा कारने चौघांना चिरडले. अपघातानंतर जेव्हा ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी या कारची पाहणी केली, तेव्हा सर्वांचेच डोळे पांढरे झाले. या कारला चक्क दोन वेगवेगळ्या नंबर प्लेट्स लावण्यात आल्या होत्या.
- पहिली प्लेट: MH 12 JM 0101
- दुसरी प्लेट (खाली दडवलेली): MH 15 EX 9694 एकाच वाहनावर दोन जिल्ह्यांचे पासिंग असणे, हे ही गाडी गुन्हेगारी कृत्यांसाठी वापरली जात असल्याचे स्पष्ट संकेत देत आहे.
पोलीस गणवेश आणि काठ्या: तोतयागिरीचा ‘खाकी’ बनाव
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या कारची झडती घेतली असता त्यामध्ये पोलीस ड्रेस आणि काठ्या आढळून आल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पुरनाड फाटा ते महामार्ग या परिसरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी तरुणांची टोळी सक्रिय आहे. हे तरुण पोलिसांचा बनाव करून किंवा पोलिसांच्या नावाने वाहन चालकांना थांबवून त्यांच्याकडून वसुली करणे, अवैध गुटखा आणि अमली पदार्थांची तस्करी करणे असे प्रकार करत आहेत.
“रात्रीस खेळ चाले”: महामार्गावर रात्रीच्या अंधारात ‘तोतया’ पोलिसांचे राज्य चालते की काय? अशी भीती आता प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे. या अवैध धंद्यांना स्थानिक प्रशासनाचे किंवा काही भ्रष्ट पोलिसांचे मूक समर्थन आहे का? असा खडा सवाल आता नागरिक विचारत आहेत.
गृह खात्याच्या डोळ्यात अंजन घालणारी स्थिती
राज्याचे गृह खाते सुरक्षित महामार्गाचा दावा करत असताना, मुक्ताईनगरमधील ही घटना म्हणजे सुरक्षिततेच्या चिंधड्या उडवणारी आहे. जर महामार्गावर उघडपणे पोलिसांचे कपडे वापरून गुन्हेगार फिरत असतील, तर सर्वसामान्यांनी कुणाकडे पाहायचे?
प्रशासनासमोर उभे ठाकलेले प्रश्न:
- दोन नंबर प्लेट्स असलेल्या गाड्या महामार्गावरील सीसीटीव्ही आणि टोल नाक्यांवरून सुसाट कशा सुटतात?
- गाडीत सापडलेले पोलीस गणवेश कुणाचे आहेत?
- अवैध तस्करी आणि लुटीच्या तक्रारी असतानाही रात्रीची गस्त का वाढवली गेली नाही?
मागणी: या प्रकरणी केवळ अपघाताचा गुन्हा दाखल न करता, यामागे असलेल्या मोठ्या टोळीचा आणि त्यांना साथ देणाऱ्या ‘वरदहस्ता’चा शोध घेण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.








