होम मुक्ताई दूत जळगाव देश – विदेश महाराष्ट्र राजकीय खेळ व्हायरल लाइफस्टाइल मनोरंजन E-Paper
Breaking

संकटांना भिडणारा अभ्यासू चेहरा: लोकसेवेचा ध्यास घेतलेले ॲड. चेतन रविंद्र झनके

Follow Us:

संकटांना भिडणारा अभ्यासू चेहरा: लोकसेवेचा ध्यास घेतलेले ॲड. चेतन रविंद्र झनके

महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात अनेकदा वतनदारी किंवा राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घराण्यांचाच बोलबाला राहिला आहे. मात्र, या प्रस्थापित प्रवाहाला छेद देत तळागाळातील सामान्य कुटुंबातून आलेले, अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून थेट न्यायदानाच्या क्षेत्रात उतरलेले आणि अल्पावधीतच मुक्ताईनगरच्या राजकारणात एक लढाऊ व अभ्यासू नेतृत्व म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेले नाव म्हणजे ॲड. चेतन रविंद्र झनके. जिद्द, चिकाटी आणि निखळ जनसेवेच्या जोरावर त्यांनी जनतेच्या मनात जे स्थान मिळवले आहे, ते आजच्या राजकारणात खरोखरच प्रेरणादायी ठरत आहे.


मुक्ताईनगरच्या मराठी मुलांच्या शाळा क्रमांक दोनमधून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर, त्यांनी आपले शालेय व उच्च माध्यमिक शिक्षण येथीलच जे. ई. स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधून विज्ञान शाखेत पूर्ण केले. लहानपणापासूनच आरटीओ इन्स्पेक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चेतन यांनी पुढे पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या इंदापूरच्या एस. बी. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. इंजिनिअरिंगचे कठीण शिक्षण घेत असतानाच, समाजातील अन्याय, कायदेशीर बाबी आणि प्रशासकीय गुंतागुंत जवळून अनुभवत असताना त्यांना एक जाणीव प्रकर्षाने झाली, ती म्हणजे केवळ तांत्रिक शिक्षण घेऊन चालणार नाही तर सर्वसामान्यांच्या हक्कासाठी कायदेशीर लढा देण्याची ताकद आपल्या पाठीशी हवी. याच विचारातून त्यांनी डॉ. उल्हास पाटील लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी (एलएलबी) देखील पूर्ण केली. त्यांचे वडील जिल्हा परिषद पंचायत समितीतून वरिष्ठ लिपिक म्हणून तीस वर्षांची सेवा बजावून सेवानिवृत्त झाले. एका सर्वसाधारण कुटुंबातून आलेल्या चेतन यांच्यावर त्यांच्या वडिलांच्या प्रामाणिकपणाचे आणि कष्टाळू स्वभावाचे मोठे संस्कार झाले.
राजकारणात येण्याचा दूरदूरपर्यंत कोणताही विचार नसताना आणि पाठीमागे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही केवळ समाजकारणाच्या ओढीने ते सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले. शिव-फुले-शहू-आंबेडकरांची पुरोगामी विचारधारा उराशी बाळगून त्यांनी कोरोनाच्या कठीण काळात केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय ठरले. जेव्हा संपूर्ण जगात भीतीचे वातावरण होते आणि कडक लॉकडाऊन सुरू होता, तेव्हा मुक्ताईनगर चौकात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांना नित्यनियमाने चहा-नाश्त्याचे नियोजन करण्यापासून ते गरजूंपर्यंत अन्नाची पाकिटे पोहोचवण्याचे मोठे काम त्यांनी केले. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जेव्हा संसर्गाचा वेग प्रचंड होता, तेव्हा रुग्णांना थेट रुग्णालयात नेणे, त्यांना लागणारी वैद्यकीय मदत पुरवणे आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी मार्गदर्शन करणे या कामांमध्ये ते कायम आघाडीवर राहिले. हे सर्व समाजकार्य करत असताना प्रशासकीय यंत्रणेची अनास्था आणि कायदा सुव्यवस्थेचे विविध पैलू त्यांच्या लक्षात आले. याचदरम्यान मुक्ताईनगर शहरात घनकचरा व्यवस्थापनाचा व घंटागाडीच्या अनियमिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. प्रशासनाची मुजोरी वाढत असताना जनतेच्या वतीने तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना अत्यंत आक्रमकपणे आणि परिपूर्ण कायदेशीर माहितीच्या आधारे दिलेले उत्तर चांगलेच गाजले, आणि तेथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाची न कळत पायाभरणी झाली.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, महाविकास आघाडीच्या राजकीय समीकरणांमध्ये काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्याबाबत अनिश्चितता असतानाही त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेसचा मार्ग मोकळा झाला. डॉ. जगदीश पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अवघ्या दहा मिनिटे शिल्लक असताना त्यांनी काँग्रेस पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म जोडत पक्षात प्रवेश केला आणि निवडणूक लढवली. या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला तरी ते अजिबात खचले नाहीत. उलट, कुटुंबाची खंबीर साथ, भाऊ लोकांचे अफाट प्रेम आणि मित्रांच्या आधाराने ते पराभवाच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा जोमाने लोकांच्या सेवेसाठी रुजू झाले. त्यांच्या मते निवडणूक लढवणे किंवा न लढवणे ही त्यांची दुसरी प्राथमिकता होती, परंतु लोकांची कामे करणे आणि त्यांच्या मनात अतुट स्थान निर्माण करणे ही त्यांची पहिली प्राथमिकता होती.
आज ते शासकीय कार्यालये असोत, रुग्णालयांचे प्रश्न असोत किंवा सर्वसामान्यांच्या अडीअडचणी असोत, प्रत्येक ठिकाणी धावून जात आहेत. महागाई आणि डिझेल टंचाईच्या काळात त्यांनी घेतलेले अनोखे आंदोलन राज्यभर चर्चेचा विषय ठरले. इराण आणि अमेरिकेच्या युद्धाच्या काळात डिझेलची टंचाई निर्माण झाली असताना बॅलेर भरून देत त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. तसेच, महाराष्ट्रभरात डिझेल भाववाढ व टंचाई विरोधात युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी ‘मेलोडी’ वाटून अत्यंत आगळेवेगळे आणि लक्षवेधी आंदोलन केले, ज्याची चर्चा राज्यभर झाली. दिल्लीच्या जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या वापरा विरोधात मुक्ताईनगरमधील विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्च्यात त्यांनी घेतलेला सक्रिय सहभाग त्यांच्या लढाऊ बाण्याचा परिचय देणारा ठरला.
आपल्या जाहीरनाम्यात ‘एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व’ अशी ठळक भूमिका मांडणाऱ्या चेतन यांनी खरोखरच ही संकल्पना प्रत्यक्षात आणून दाखवली आहे. प्रशासनात कुठेही कामचुकारपणा दिसून आला तर त्याला थेट भिडण्याची, जाब विचारण्याची आणि हक्काचे काम करून घेण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. कचऱ्याच्या प्रश्नावर मुख्याधिकाऱ्यांना थेट कचरा प्रांगणात आणून टाकण्याचा दिलेला इशारा असो, मुक्ताईनगर चौक परिसरातील महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहाची केलेली आक्रमक मागणी असो, पोलीस अधीक्षकांकडे सीसीटीव्ही बसवण्याची मागणी असो किंवा महापुरुषांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यांच्या आकर्षक सजावटीचे नियोजन असो; त्यांनी प्रत्येक मुद्द्यावर प्रशासनाला धारेवर धरून कामे मार्गी लावली आहेत. त्यांच्या स्वभावात असलेला अफाट अभ्यासू दृष्टिकोन आणि प्रखर आक्रमकपणा हाच त्यांचा खरा स्थायीभाव आहे. आज काँग्रेस पक्षात दाखल झाल्यानंतर त्यांनी पक्षाच्या विचारांना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे जे काम सुरू केले आहे, त्यामुळे पक्षात एक नवी ऊर्जा संचारली आहे. सर्वसामान्यांच्या हक्कासाठी अहोरात्र झटणारे आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे हे अभ्यासू नेतृत्व भविष्यात मुक्ताईनगरच्या राजकीय पटलावर एक नवी आणि प्रभावी दिशा देईल, यात शंका नाही.त्यांच्या आज असलेल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Join WhatsApp

Join Now

Subcribe Youtube

Subcribe Now

Leave a Comment

error: Content is protected !!