संकटमोचक राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त शिरसाळा येथे ३० हजार लाडूंचे महाप्रसाद वाटप!
मुक्ताईनगर / शिरसाळा (प्रतिनिधी): राज्याचे लाडके नेते आणि संकटमोचक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्ह्यात विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांची मोठी रेलचेल पाहायला मिळणार आहे. या सोहळ्याची सुरुवात पूर्वसंध्येला शनिवार, दि. १६ मे २०२६ रोजी शिरसाळा (ता. बोदवड) येथील प्रसिद्ध ‘सिद्धेश्वर हनुमान मंदिर’ येथून भव्य स्वरूपात होणार आहे.यासाठी खामखेडा ता.मुक्ताईनगर येथील योगराज कन्स्ट्रक्शनचे संचालक विनोद सोनवणे व परिवाराच्या वतीने जय्यत तयारी सुरु आहे.

15 हजार आकर्षक खोक्यातून 30 हजार लाडूंचे वाटप

वाढदिवसाचे औचित्य साधून जागृत आणि नवसाला पावणाऱ्या शिरसाळा येथील सिद्धेश्वर हनुमान मंदिरात भाविकांना महाप्रसाद म्हणून ३० हजार मोतीचूर लाडूंचे वाटप केले जाणार आहे. विशेष म्हणजे, स्वच्छतेचे आणि आकर्षणाचे भान राखून हे लाडू १५ हजार सुबक खोक्यांमध्ये (पॅकिंग) भाविकांना आदराने वितरित केले जातील. हा उपक्रम भाविकांसाठी श्रद्धेची मोठी पर्वणी ठरणार आहे.
शनिवारचे धार्मिक व सामाजिक कार्यक्रम:

शनिवारी सकाळी शिरसाळा मंदिरात ‘महाआरती’ संपन्न होणार असून त्यानंतर भाविकांना लाडू वाटपाचा प्रारंभ होईल. दुपारी याच ठिकाणी भक्तीमय वातावरणात ‘संगीत सुंदरकांड भजन’ आयोजित करण्यात आले आहे. तसेच, सामाजिक बांधिलकी म्हणून शिरसाळा मंदिरात ‘रक्तदान शिबिराचे’ देखील आयोजन करण्यात आले असून, यात तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रविवारी जळगावात ६६ फुटी भव्य कट-आउट!
वाढदिवसाच्या मुख्य दिवशी म्हणजे रविवार, दि. १७ मे रोजी जळगाव येथील जी. एस. ग्राऊंडवर भाऊंचे आजवरचे सर्वात उंच ६६ फुटी भव्य कट-आउट उभारण्यात आले आहे. यावेळी संध्याकाळी भव्य केक कापून मोतीचूर लाडूंचे वाटप करण्यात येणार आहे. सोबतच आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि भविष्यातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व वृक्ष वाटपाचा संकल्पही करण्यात आला आहे.
मुक्ताईनगरच्या सोनवणे परिवारातर्फे आयोजन
या संपूर्ण भव्य सोहळ्याचे आणि शिरसाळा येथील महाप्रसादाचे नियोजन मुक्ताईनगरचे विनोद नामदेव सोनवणे (योगराज कन्स्ट्रक्शन) यांनी केले आहे. आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. या सोहळ्याला परिसरातील भाविकांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.






