होम मुक्ताई दूत जळगाव देश – विदेश महाराष्ट्र राजकीय खेळ व्हायरल लाइफस्टाइल मनोरंजन E-Paper
Breaking

बोदवडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा संतापजनक खेळखंडोबा! चोरीची तक्रार केल्याचा राग मनात धरून तरुणाची भरचौकात चाकूने भोसकून निर्घृण हत्या

बोदवडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा संतापजनक खेळखंडोबा! चोरीची तक्रार केल्याचा राग मनात धरून तरुणाची भरचौकात चाकूने भोसकून निर्घृण हत्या

पोलीस अधीक्षकांच्या उत्तरानंतर आ. चंद्रकांत पाटील प्रचंड संतप्त; थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार, बोदवड बंदसह मृतदेह SP कार्यालयात नेण्याचा आक्रमक पवित्रा!

बोदवड (अमोल व्यवहारे ): बोदवड शहरातील इंदिरा नगर भागात एका ३२ वर्षीय तरुणाची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अन्सार पिंजारी (वय ३२) असे या मृत तरुणाचे नाव असून, अवघ्या चार दिवसांपूर्वी घरात झालेल्या चोरीची पोलिसांत तक्रार केल्याचा राग मनात धरून ही हत्या करण्यात आली. या घटनेनंतर बोदवडमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री आणि पोलीस प्रशासनाविरुद्ध आरपारची लढाई पुकारली आहे.
नेमकी घटना काय?

मयत अन्सार पिंजारी यांच्या घरात ४ दिवसांपूर्वी चोरी झाली होती. याप्रकरणी त्यांनी बोदवड पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली होती. मात्र, संशयित आरोपी अब्रार लतीफ शाह याला याचा प्रचंड राग आला. याच रागातून अब्रार शाह याने अन्सार पिंजारी यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, अन्सार यांचा जागीच मृत्यू झाला.

आरोपी सराईत गुन्हेगार आणि गांजेखोर!

हल्लेखोर अब्रार शाह हा नशेखोर (गांजाचा नशा करणारा) असून, परिसरात त्याची मोठी दहशत होती. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही पोलीस प्रशासनाकडे अनेक गंभीर तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, पोलिसांनी वेळीच ठोस कारवाई न केल्यामुळेच आज एका निरपराध तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या ‘असमाधानकारक’ उत्तराने ठिणगी!

घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ सूत्रे हाती घेतली. त्यांनी या घटने संदर्भात थेट *जिल्हा पोलीस अधीक्षक (SP)* यांच्याशी संपर्क साधून जाब विचारला. मात्र, या गंभीर घटनेवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अत्यंत *असमाधानकारक आणि उडवाउडवीची उत्तरे* दिली. एसपींच्या या उदासीन भूमिकेमुळे आमदार चंद्रकांत पाटील यांचा पारा प्रचंड चढला आणि त्यांनी पोलिसांना जागेवरच धारेवर धरले.

आ. चंद्रकांत पाटील यांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन; आक्रमक पवित्रा!

पोलीस प्रशासनाच्या या बेजबाबदार आणि ढिसाळ कारभारावर संतप्त होत आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* यांना फोन लावला. त्यांनी जिल्ह्यातील खाकी वर्दीच्या नाकर्तेपणाची आणि गांजाड्या गुन्हेगारांच्या दहशतीची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे केली.
पोलीस प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी आणि मयताला न्याय मिळवून देण्यासाठी आ. पाटील यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे:

बोदवड शहर बंदचा दिला इशारा :

पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यासाठी संपूर्ण बोदवड गाव बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच  जोपर्यंत दोषींवर आणि निष्काळजी पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत मयताचे प्रेत थेट जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या (SP) दालनात घेऊन जाण्याचा आक्रमक इशारा आ. चंद्रकांत पाटील यांनी दिला होता.

“परिसरात उघडपणे गांजा आणि अवैध धंदे सुरू आहेत, पोलीस प्रशासन झोपले आहे का? जर चोरीची तक्रार केल्यावर नागरिकांची अशी हत्या होत असेल, तर लोकांनी सुरक्षेसाठी कोणाकडे पाहायचे? या गांजाड्या आणि सराईत गुन्हेगारांना पोलिसांचे अभय आहे का?”* असा संतप्त सवाल आमदारांनी उपस्थित केला आहे.

परिसरात प्रचंड तणाव
आमदारांच्या या आक्रमक भूमिकेनंतर आणि रुग्णालयाबाहेर जमलेल्या शेकडो नागरिकांच्या प्रचंड जनक्षोभामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जोपर्यंत पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाईचे आश्वासन मिळत नाही आणि नशाखोरीवर कायमचा हातोडा पडत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा निर्धार लोकप्रतिनिधी आणि जनतेने केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subcribe Youtube

Subcribe Now

Leave a Comment

error: Content is protected !!