श्री संत मुक्ताई ७२९ वा अंतर्धान समाधी सोहळ्यास भक्तिमय वातावरणात सुरुवात

आदिशक्ती मुक्ताबाई यांनी सुमारे ७२९ वर्षांपूर्वी वैशाख कृष्ण दशमी रोजी विजेच्या कडकडाटात अंतर्धान घेत स्व-स्वरूपात लीन झाल्याची ओढ आणि परंपरा आजही वारकरी संप्रदायात मोठ्या श्रद्धेने जपली जाते. याच परंपरेचा वारसा सांगणारा श्री संत मुक्ताई ७२९ वा अंतर्धान समाधी सोहळा आजपासून श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथील पवित्र समाधीस्थळी मोठ्या उत्साहात सुरू होत आहे. दि. ४ मे ते १४ मे २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या सोहळ्यात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार असून, वैशाख कृष्ण तृतीयेपासून सुरू झालेला हा सोहळा वैशाख कृष्ण द्वादशीपर्यंत चालणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने पंढरपूर येथून संत नामदेव महाराज व भगवान पांडुरंगाच्या पादुका, त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ महाराज, सासवड येथून संत सोपानकाका आणि कौंडण्यपूर येथून माता रुक्मिणी मातांच्या पादुका सोहळ्याचे भव्य आगमन होणार आहे. याशिवाय आळंदी व देहू येथील संत संस्थानांचे प्रतिनिधी व विविध संत-महंतांच्या उपस्थितीने या सोहळ्याला विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

सोहळ्याचे स्वरूप अत्यंत व्यापक असून यामध्ये दररोज पहाटे ४ ते ६ काकड आरती, त्यानंतर विष्णू सहस्रनाम, मुक्ताई पाठ आणि सकाळी ७ ते ११ या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण पार पडणार आहे. दुपारच्या सत्रात गाथा भजन व प्रवचन, तर सायंकाळी हरिपाठ व आरती होईल. रात्री ८:३० ते १०:३० या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा संपन्न होईल. यामध्ये ह.भ.प. दिपक महाराज पाटील, ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे, ह.भ.प. भरत महाराज पाटील आणि ह.भ.प. सारंगधर महाराज गोळेगावकर यांच्यासह अनेक मान्यवर आपली सेवा रुजू करणार आहेत. या सोहळ्यातील मुख्य आकर्षण असलेला ‘अंतर्धान समाधी सोहळा’ मंगळवार, दि. १२ मे रोजी सकाळी १०:३० वाजता ह.भ.प. केशवदास नामदास महाराज यांच्या कीर्तनाने आणि पुष्पवृष्टीने साजरा होईल. संपूर्ण सोहळ्याची सांगता गुरुवार, दि. १४ मे रोजी सकाळी ७ वाजता काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष ह.भ.प. रविंद्र प्रल्हादराव पाटील आणि पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे, व्यवस्थापक ह.भ.प. उद्धव महाराज जुनारे यांच्यासह समस्त भाविक परिश्रम घेत असून, परिसरातील सर्व भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.







