मुक्ताईनगरमध्ये ‘ऑन द स्पॉट’ न्याय की कायद्याचा बाजार? डान्स क्लासमधील ‘राडा’ पोलीस ठाण्यात मिटला; चर्चेला उधाण
मुक्ताईनगर (प्रतिनिधी): शहरातील बोदवड रोडवरील एका डान्स क्लासमध्ये मंगळवारी (२१ एप्रिल) सायंकाळी घडलेल्या थराराने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. एका डान्स कोरिओग्राफरने मुलीची छेड काढल्याच्या आरोपावरून जमावाने त्याला कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण करत त्याची धिंड काढली. मात्र, रात्रभर चाललेल्या हायहोल्टेज ड्राम्यानंतर सकाळी ‘काहीच घडले नाही’ अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याने, हा न्याय होता की एखादे मोठे ‘आर्थिक देवाण-घेवाण’ प्रकरण, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कोरिओग्राफरने त्याच्याच क्लास मधील एका अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केल्याचा संशय व्यक्त करत काही तरुणांनी क्लासमध्ये शिरून त्याला बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी अमानुष होती की, क्लास मध्ये लहान लहान कोवळया मनाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या समक्ष तसेच तेथून काढून पोलीस स्टेशन पर्यंत भररस्त्यात त्या शिक्षकाचे कपडे फाडून त्याला विवस्त्र अवस्थेत पोलीस स्टेशनपर्यंत नेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात पीडितेची तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया आणि ‘पोस्को’ (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस दप्तरी कोणत्याही गुन्ह्याची नोंद नसल्याचे समोर आल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
या प्रकरणातील अनुत्तरित प्रश्न आणि प्रशासकीय त्रुटी:
कायद्याचा धाक की दहशतीचे राजकारण?
1) जर संबंधित शिक्षक दोषी होता, तर त्याला कायद्याने शिक्षा मिळणे अपेक्षित होते. मात्र, लहान मुलांसमोर झालेली ही अमानुष मारहाण आणि धिंड काढणे, हे कृत्य सभ्य समाजात बसणारे आहे का? केवळ संशयावरून कोणाचेही चारित्र्यहनन करण्याचे स्वातंत्र्य जमावाला कोणी दिले?
2) पीडितेच्या नातेवाईकांनी मारहाण का केली? कायदा वैगरे नाही का? Viral व्हिडीओ मुळे तुमच्यावरही गुन्हा होईल असा संतप्त रुद्रअवतार घेतलेल्या व क्रॉस तक्रार दाखल करण्याच्या तयारीत असलेल्या API साहेब यांना असा कोणता साक्षात्कार झाला व घटनेचे प्रकरण दडपण्यात आले.
पोलिसांची संशयास्पद भूमिका:
रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची भाषा करणारे पोलीस अधिकारी सकाळी ‘तक्रारच आली नाही’ असे का सांगत आहेत? इतका मोठा राडा होऊनही साधी ‘एनसी’ (NC) दाखल न होणे, हे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करते. यामागे मोठे ‘आर्थिक हितसंबंध’ जोपासले गेले असल्याचा आरोप शहरात उघडपणे होत आहे.
पालकांमध्ये चिंतेचे वातावरण:
एकीकडे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, तर दुसरीकडे अशा प्रकारे स्वतःच न्याय निवाडा (Mob Lynching Mentality) करण्याची प्रवृत्ती वाढल्यास भविष्यात कोणीही सुरक्षित राहणार नाही. जर हे प्रकरण परस्पर मिटवले गेले असेल, तर छेडछाड खरंच झाली होती का? की कोणाचे करिअर संपवण्यासाठी हा रचलेला कट होता?
जर घटना खोटी असेल तर सदरील तरुण शिक्षकाचे आयुष्य कोण उद्वस्थ करू पाहत आहे का?
आणि घटना खरी असेल तर पालकांनी कोणत्या विश्वासावर महिला किंवा मुलींना असल्या क्लासेस किंवा जिम मध्ये पाठवयाचे?
निष्कर्ष:
कायदा आणि सुव्यवस्था केवळ कागदावरच मर्यादित आहे का? असा प्रश्न आता मुक्ताईनगरकर विचारत आहेत. अशा गंभीर प्रकरणांमध्ये जर पोलिसांनी सोयीची भूमिका घेतली, तर गुन्हेगारांचे मनोबल वाढेल किंवा निष्पाप लोक दहशतीच्या सावलीत जगतील. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन सत्य जनतेसमोर येणे गरजेचे आहे.
“जर कोणी दोषी असेल तर त्याला कायद्याने कठोर शिक्षा व्हावी, पण कायद्याला हातात घेऊन कोणाचेही आयुष्य उध्वस्त करण्याचा अधिकार कोणालाही नाही. पोलिसांनी या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करावी. अशी मागणी नागरिक करीत आहे.






