होम मुक्ताई दूत जळगाव देश – विदेश महाराष्ट्र राजकीय खेळ व्हायरल लाइफस्टाइल मनोरंजन E-Paper
Breaking

पावसाळ्यापूर्वी नाले सफाई करा, नगरसेवक नितीन जैन यांचे मुख्याधिकाऱ्यांना पत्र;

एन.ए. धारकांच्या अतिक्रमणामुळे शहरात पूरस्थितीची भीती, भविष्यात जलमय परिस्थिती उद्भवल्यास जबाबदार कोण?

​मुक्ताईनगर (प्रतिनिधी):

पावसाळा तोंडावर आलेला असताना मुक्ताईनगर शहरातील नालेसफाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील मुख्य नाले गाळाने भरलेले असून, अनेक ठिकाणी अतिक्रमणांमुळे नाल्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक नितीन मदनलाल जैन यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन पावसाळ्यापूर्वी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

प्रभाग १७, १३ आणि १२ मधील नाल्यांची दुरवस्था:

नगरसेवक नितीन जैन यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, मे महिना संपत आला असून लवकरच मान्सूनचे आगमन होईल. त्यापूर्वी प्रभाग क्रमांक १७, १३, १२ मधील मोठे नाले, तसेच गोदावरी मंगल कार्यालयाच्या मागील मुख्य नाल्यातील गाळ काढणे अत्यंत गरजेचे आहे. नाल्यांच्या बाजूला वाढलेल्या काटेरी झाडाझुडपांमुळे पाण्याचा प्रवाह अडथळा निर्माण होत असून, या काट्या तात्काळ तोडण्यात याव्यात.

कचरा गाडी आणि सफाई कामगारांचे नियोजन शून्य?

केवळ नालेच नव्हे तर शहरातील सर्व प्रभागांमधील गटारींमधील गाळ काढून त्या स्वच्छ कराव्यात. तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या लक्षात घेता, सफाई कामगार आणि कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांचे चोख नियोजन करावे, अशी मागणीही जैन यांनी केली आहे.

एन.ए. धारकांचे अतिक्रमण: नागरिकांचा संताप!

शहरात एकीकडे सफाईचा प्रश्न असताना दुसरीकडे ‘एन.ए.’ धारकांनी नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाहात अडथळा निर्माण केला आहे. अनेकांनी प्लॉट्स पाडताना नाल्यांवर अतिक्रमण केले असून, काही ठिकाणी तर मोठ्या नाल्यांची केवळ एक फुटाची चारी शिल्लक ठेवली आहे. शहराचा नैसर्गिक उतार दक्षिणेकडून उत्तरेकडे असताना या अतिक्रमणांमुळे पावसाळ्यात पाणी तुंबून पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

जबाबदार कोण?

जर यंदाच्या पावसाळ्यात या अतिक्रमणांमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले किंवा जीवित-वित्तहानी झाली, तर त्याला जबाबदार कोण? हे मनमानी करणारे एन.ए. धारक, की याकडे दुर्लक्ष करणारे नगरपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी? असा संतप्त सवाल आता मुक्ताईनगरचे नागरिक उपस्थित करत आहेत.

​”वेळेत नालेसफाई आणि अतिक्रमणांवर कारवाई झाली नाही, तर पावसाळ्यात मुक्ताईनगरकरांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात.”

— नितीन मदनलाल जैन (नगरसेवक, मुक्ताईनगर नगरपंचायत)

Join WhatsApp

Join Now

Subcribe Youtube

Subcribe Now

Leave a Comment

error: Content is protected !!