श्री.क्षेत्र कोथळी येथे साकारणार आदिमायेचा संपूर्ण जीवनपट!

संत मुक्ताई समाधी स्थळावर १२ भव्य म्युरल्सच्या माध्यमातून वारकऱ्यांना लाभणार अलौकिक अनुभूती; मुंबईत काम युद्धपातळीवर सुरू.
मुक्ताईनगर (संतोष मराठे): “ताटी उघडा ज्ञानेश्वरा”... म्हणत संपूर्ण विश्वाला उपदेश करणाऱ्या आणि वारकरी संप्रदायात ‘आदिमाया’ म्हणून पूजिल्या जाणाऱ्या श्री संत मुक्ताबाईंचा अलौकिक जीवनप्रवास आता श्री क्षेत्र कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथील समाधी स्थळावर जिवंत होणार आहे. मुक्ताईच्या पावन चरित्राची साक्ष देणारी एक भव्य दिव्य भिंत याठिकाणी साकारण्यात येत असून, यामध्ये संत मुक्ताबाईंच्या जीवनातील १२ महत्त्वपूर्ण प्रसंगांचे ‘म्युरल’ (भिंतीवरील शिल्पकला) रूप भाविकांना पाहायला मिळणार आहे. सध्या या ऐतिहासिक कलाकृतीचे काम मुंबई येथे अत्यंत वेगाने आणि युद्धपातळीवर सुरू आहे.

शिल्पकलेतून उलगडणार भक्ती आणि चमत्काराचा इतिहास
समाधी स्थळावर येणाऱ्या देश-विदेशातील भाविकांना आणि वारकऱ्यांना संत मुक्ताईंच्या जीवन पटाची थेट अनुभूती यावी, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. केवळ मूर्ती किंवा चित्रे न राहता, अध्यात्मिक शब्द संस्कारांची जोड देऊन या म्युरल्सची निर्मिती केली जात आहे. यामध्ये प्रत्येक शिल्पाच्या सोबत संबंधित प्रसंगाचा आधार असलेला ‘अभंग’ आणि त्याचा सोप्या ‘मराठी भाषेत अर्थ’ देखील कोरला जाणार आहे, ज्यामुळे नवीन पिढीला या इतिहासाचे अचूक ज्ञान मिळेल.

या १२ मुख्य प्रसंगांनी सजणार ‘मुक्ताई चरित्र भिंत’
शिल्पकलेच्या माध्यमातून साकार होणारे १२ अध्यात्मिक अध्याय खालीलप्रमाणे आहेत:
१) श्रीसंत मुक्ताबाई जन्म: आदिमायेचे या भूतलावर झालेले दिव्य आगमन.
२) श्री संत मुक्ताबाईंना गुरुपदेश: निवृत्तीनाथांकडून मुक्ताबाईंना मिळालेला सुवर्ण गुरुपदेश.
३) पैठण येथील धर्मसभा: भावंडांना शुद्धीपत्र नाकारणाऱ्या पैठणच्या पंडितांसमोर झालेला संवाद.
४) रेड्यामुखी वेद वदविला: ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतलेला तो जगप्रसिद्ध चमत्कार.
५) नेवासे येथे ज्ञानेश्वरी संकलन: नेवासे येथे सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून अवतरलेली ‘ज्ञानेश्वरी’ लिहून घेतली, त्या वेळची मुक्ताबाईंची उपस्थिती.
६) ताटी उघडा ज्ञानेश्वरा: विश्वाचे कल्याण करणाऱ्या ज्ञानदेवांना मुक्ताईने घातलेली आर्त साद.
७) पाठीवरी मांडे भाजले: योगसामर्थ्याने पाठीवर मांडे भाजून मुक्ताईने योगी चांगदेवांचे डोळे उघडले तो प्रसंग.
८) नामदेव महाराजांचा गर्वपरिहार: संत नामदेवांच्या मनातील सुप्त अहंकार दूर करून त्यांना गुरुचे महत्त्व पटवून देणारा प्रसंग.
९) प्रेते जिवंत केली: चांगदेव महाराजांच्या तपस्थळावर मुक्ताबाईंच्या कृपेने घडलेला अद्भूत प्रसंग.
१०) चांगदेव महाराजांचा गर्वपरिहार: १४०० वर्षे वय असलेल्या वाघावर आलेल्या चांगदेवांचे चौदा वर्षांच्या मुक्ताईने केलेले गर्वहरण आणि त्यांना दिलेला मार्ग.
११) मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळा: तापी तीरावर झालेला आदिमायेचा शेवटचा महापरिनिर्वाण/समाधी सोहळा.
१२) महतनगर पंचक्रोशीतील तिर्थ: मुक्ताईनगर पंचक्रोशीतील पवित्र तीर्थक्षेत्रांचे महत्त्व सांगणारे अंतिम शिल्प.
लवकरच भाविकांच्या सेवेत!
“मुंबईच्या नामांकित कलाकारांकडून या शिल्पांना अंतिम रूप दिले जात आहे. अगदी मातीचे काम (Clay Modeling) आणि फायबर-मेटल फिनिशिंग अत्यंत बारीक कलाकुसरीने केले जात आहे. लवकरच हा संपूर्ण जीवनपट श्री क्षेत्र कोथळी येथे स्थापित केला जाईल, ज्यामुळे मुक्ताईनगरच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाईल.”
ॲड.रवींद्र भैय्यासाहेब पाटील, अध्यक्ष संत मुक्ताई संस्थान, मुक्ताईनगर







