मुक्ताईनगरच्या वैभवात भर: आमदार चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून शहरात साकारली जातेय ‘शहाबादी दगडी’ रस्त्यांची मुहूर्तमेढ!
; राजस्थानी कारागिरांच्या हातून ‘भिल्लवाडी’ मार्गाचे सौंदर्यीकरण प्रगतीपथावर
मुक्ताईनगर | प्रतिनिधी
आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या मुक्ताईनगर शहराच्या विकासाला आता सौंदर्याची झालर लाभणार आहे. शहराचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध असलेले शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगरमध्ये ‘शहाबादी दगडी’ रस्त्यांचा नवा प्रयोग हाती घेतला असून, भिल्लवाडी परिसरातील मुख्य रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. जुन्या काळातील वैभवशाली दगडी रस्त्यांची आठवण करून देणारा हा मार्ग शहराच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
जळगावच्या धर्तीवर मुक्ताईनगरचा विकास
काही काळापूर्वी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अशाच प्रकारचे शहाबादी दगडांचे सुबक रस्ते तयार करण्यात आले होते. हे काम पाहून आमदार चंद्रकांत पाटील भारावून गेले होते. आपल्या मतदारसंघातील तिर्थक्षेत्राचे स्वरूप असलेल्या मुक्ताईनगरमध्येही अशाच पद्धतीचे दर्जेदार आणि देखणे रस्ते असावेत, असा निश्चय त्यांनी केला होता. त्यानुसार, भिल्लवाडी भागातील आपल्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यासाठी त्यांनी सुमारे ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
राजस्थानी कारागिरांचे कौशल्य


या रस्त्याचे वैशिष्ट्य म्हणजे याचे बांधकाम पारंपरिक डांबरी किंवा सिमेंट पद्धतीने न करता, शहाबादी दगडांचा वापर करून केले जात आहे. हे दगड अत्यंत सुबक पद्धतीने बसवण्यासाठी खास राजस्थानवरून कारागिरांची टीम पाचारण करण्यात आली आहे. दगडांच्या मांडणीतून तयार होणारी फुलांसारखी नक्षी आणि आकर्षक सजावट या रस्त्याच्या सौंदर्यात मोठी भर पाडत आहे.
भविष्यात शहराचा चेहरामोहरा बदलणार
सध्या शहरात पाणीपुरवठा योजना योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरु असल्याने भुयारी गटारीच्या प्रस्तावाचा मार्गही अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात शहरातील पिण्याच्या पाईपलाईनचे जाळे आणि भुयारी गटारी कामे पूर्ण झाल्यानंतर शहरातील इतर प्रमुख रस्ते देखील याच ‘शहाबादी दगडी ‘ रस्त्यांच्या धर्तीवर करण्याचा मानस आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे.
”मुक्ताईनगर हे केवळ शहर नसून एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येथील विकासकामे करताना त्यात आधुनिकता आणि सौंदर्याचा संगम असावा, हा प्रयत्न आहे. भिल्लवाडीचा हा रस्ता केवळ सुरुवात असून, आगामी काळात पूर्ण शहरात अशाच दर्जाचे रस्ते पाहायला मिळतील असे अनेक वेळा वैयक्तिक चर्चा करतांना मनातील भाव व्यक्त करीत असतात.”










