जळगावात खळबळ: बेकायदेशीर सावकारी चौकशीत अनुकूल अहवालासाठी ५ लाखांची लाच मागून १.५ लाख घेताना उपनिबंधक जगदीश बारी एसीबीच्या जाळ्यात; खाजगी मध्यस्थही जेरबंद
जळगाव (प्रतिनिधी):
बेकायदेशीर सावकारीच्या चौकशी प्रकरणात अनुकूल अहवाल पाठवण्यासाठी आणि पुढील सुनावणीच्या तारखेसाठी तब्बल ५ लाख रुपयांची लाच मागून तडजोडीअंती पहिला हप्ता म्हणून दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव येथील सहकारी संस्थांचे उपनिबंधक जगदीश बाबुराव बारी आणि त्यांचा खाजगी मध्यस्थ देवीदास धनसिंग पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी (दि. २० मे २०२६) रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्यावर अवैध सावकारी संदर्भात चौकशी सुरू होती. ही सुनावणी उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव तालुका कार्यालय येथे सुरू होती. या चौकशी प्रकरणाचा अनुकूल अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यासाठी आणि पुढील सुनावणीची तारीख मिळवून देण्यासाठी उपनिबंधक जगदीश बारी यांनी तक्रारदार यांच्याकडे सुरुवातीला ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १८ मे २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), जळगाव कार्यालयात रीतसर तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने १८ मे रोजी पंचांसमक्ष या तक्रारीची पडताळणी केली. या पडताळणी दरम्यान उपनिबंधक जगदीश बारी यांनी लाचेची रक्कम तडजोडीअंती ३ लाख रुपये ठरवली आणि त्याचा पहिला हप्ता म्हणून १ लाख ५० हजार रुपये मंगळवारी, २० मे रोजी देण्यास सांगितले.
बी. जे. मार्केट परिसरात रंगेहात कारवाई
ठरल्याप्रमाणे, २० मे २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने जळगाव येथील बी. जे. मार्केटमधील ‘जळगाव जिल्हा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशन लि.’ च्या कार्यालयात सापळा रचला. जगदीश बारी यांच्या सांगण्यावरून त्यांचा खाजगी मध्यस्थ आणि जळगाव जिल्हा बँक असोसिएशनचा मानद कार्यकारी अधिकारी देवीदास धनसिंग पाटील याने तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांना रंगेहात ताब्यात घेतले.
आरोपींची माहिती:
१. जगदीश बाबुराव बारी (वय ५६ वर्ष): उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव (सहकार खाते, वर्ग-१). (रा. शांतीनगर, वावल रोड, भुसावळ).
२. देवीदास धनसिंग पाटील (वय ५४ वर्ष): मानद कार्यकारी अधिकारी, जळगाव जिल्हा बँक असोसिएशन. (रा. भुरी मामलेदार प्लॉट, शिवाजीनगर, जळगाव – खाजगी इसम).
या प्रकरणी जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ व १२ अन्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एसीबीचे आवाहन:
ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे तसेच अंमलदार हेमंत नागरे, बाळू मराठे, रंजित पवार, मनोज पाटील आणि सचिन वाटे यांच्या पथकाने यशस्वी केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्वरित एसीबी जळगाव कार्यालयाशी किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.







