एकात्मता, भक्ती आणि शौर्याचा त्रिवेणी संगम; एकनाथराव खडसे अमृत महोत्सवी नामसंकीर्तन सोहळ्यात अक्रूर साखरे महाराजांचे प्रभावी निरूपण
कोथळी/मुक्ताईनगर:
एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवी नामसंकीर्तन सोहळ्याचा दुसरा दिवस भक्ती, ज्ञान आणि शौर्याच्या त्रिवेणी संगमात न्हाऊन निघाल्याचे पाहायला मिळाले. सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी, २७ ऑगस्ट २०२६ रोजी, विशाल खोले महाराज यांच्या सुमधूर श्रीमुखातून संत मुक्ताई चरित्र, आणि ब्रजेश महाराज यांच्या अमृत तुल्य वाणीतून श्रीमद् भागवत कथा, प्रवचन आणि, काकडा, हरिपाठ, नित्य भजन यांसारख्या विविध भक्तिमय सेवा अत्यंत उत्साहात पार पडल्या. या सत्रादरम्यान उपस्थितांनी तन्मयतेने आध्यात्मिक अनुभूती घेतली, ज्याने संपूर्ण परिसर चैतन्यमय आणि तेजोमय बनला. दिवसभराच्या या धार्मिक अनुष्ठानोत्तर बीड जिल्ह्यातील गेवराई येथून लाभलेले प्रख्यात कीर्तनकार अक्रूर साखरे महाराज यांची ओघवत्या भाषेतील कीर्तन सेवा रंगली, जिने उपस्थित भाविकांच्या मनाचा ताबा घेतला.
आपल्या कीर्तनसेवेची सुरुवात करताना अक्रूर महाराजांनी संत तुकाराम महाराजांच्या ‘माझिये जातीचें मज भेटो कोणी, आवडीची धणी फेडावया’ या अतिशय प्रसिद्ध व अंतःकरणाला भिडणाऱ्या अभंगाची निवड केली. या अभंगाच्या पाच चरणांवर आधारित सखोल चिंतन मांडताना त्यांनी वारकरी संप्रदायाच्या उच्च विचारांची प्रचिती दिली. अभंग उलगडून सांगताना त्यांनी भक्ती आणि नामाचा महिमा उपस्थितांच्या मनावर बिंबवला. वारकरी संप्रदायाच्या नियमांचे आणि शिस्तीचे पालन करत, अंतरचक्षूंसमोर प्रत्यक्ष ईश्वराला ठेवून नेमकी आणि सात्विक इच्छा कशी मागितली पाहिजे, याचे सुंदर मार्गदर्शन त्यांनी केले. या विचारांच्या माध्यमातून त्यांनी केवळ पारमार्थिक मूल्येच नव्हे, तर दैनंदिन जीवनात व्यसनांपासून दूर राहून एक सुसंस्कृत आणि आदर्श जीवन जगण्याचा मोलाचा सल्ला दिला, ज्याने उपस्थितांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले.
या आध्यात्मिक प्रवासाला ऐतिहासिक आणि राष्ट्रप्रेमाच्या एका विलक्षण वळणावर नेत, अकृर महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या मोहिमेतील एका अत्यंत रोमांचक प्रसंगाला उजाळा दिला. औरंगजेबाच्या कैदेत असताना छत्रपती शिवरायांची सुटका व्हावी म्हणून वीर शिवा काशीद या धाडसी आणि देशभक्त मुस्लिम बालकाने जी प्राणांतिक मदत केली, त्या घटनेचे वर्णन करताना संपूर्ण सभामंडपात एकच सन्नाटा पसरला. शिवा काशीद यांचे अजोड स्वराज्यप्रेम, निष्ठा आणि महाराजांप्रती असलेली अटूट भक्ती याचे जिवंत चित्र उभे करणाऱ्या या आख्यानाने उपस्थित हजारो भाविकांच्या अंगावर अक्षरशः शहारे आणले. अध्यात्माच्या ओघवत्या प्रवाहात इतिहासाचे हे ज्वलंत उदाहरण मिसळल्यामुळे हा सोहळा उपस्थित जनसामान्यांच्या मनावर कायमची छाप सोडणारा ठरला.
या प्रसंगी, “डोळ्यांचे कान, कानांचे डोळे” मनात केवळ भक्ती भाव ठेवून माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, मंदाताई खडसे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, शारदाताई खडसे, रोहिणीताई खडसे, क्रीषीका, गुरुनाथ आणि सारा सरमजीत असे सर्व खडसे कुटुंब संपूर्ण सोहळ्यात पूर्णवेळ थांबून या सोहळ्याचा भक्तिमय भावनेतून आनंद घेत आहेत. तसेच सतपंथ संप्रदायांचे महामंडलेश्वर जनार्दन महाराज, संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ऍड. रवींद्र भैय्यासाहेब पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, उद्धव जुनारे महाराज, विजय खवले महाराज, पंकज महाराज, डॉ. सुनील नेवे, नरेंद्र नारखेडे, निवृत्ती पाटील,योगेश कोलते, आदीसह अनेक मान्यवर उपस्थिती देत आहे.







