होम मुक्ताई दूत जळगाव देश – विदेश महाराष्ट्र राजकीय खेळ व्हायरल लाइफस्टाइल मनोरंजन E-Paper
Breaking

पिंप्री पंचमचे कैलास राजाराम पाटील यांना ‘वारकरी भुषण वै. प्रल्हादराव एकनाथराव पाटील आदर्श वारकरी पुरस्कार २०२६’ जाहीर; संत मुक्ताई प्रति निष्ठा व सेवाभावाचा मानाचा गौरव

Follow Us:

पिंप्री पंचमचे कैलास राजाराम पाटील यांना ‘वारकरी भुषण वै. प्रल्हादराव एकनाथराव पाटील आदर्श वारकरी पुरस्कार २०२६’ जाहीर; संत मुक्ताई प्रति निष्ठा व सेवाभावाचा मानाचा गौरव

मुक्ताईनगर: संत मुक्ताई पालखी सोहळ्याच्या वारीतील अखंड सेवा, वारकरी संप्रदायातील निष्ठा आणि परंपरेचे जतन करणाऱ्या साधकांसाठी दिला जाणारा यंदाचा मानाचा ‘वारकरी भुषण वै. प्रल्हादराव एकनाथराव पाटील आदर्श वारकरी पुरस्कार २०२६’ पिंप्री-पंचम येथील निष्ठावान वारकरी कैलास राजाराम पाटील यांना जाहीर झाला आहे. वारकरी परंपरेचा वारसा जपत, गेली आठ वर्षे मुक्ताईनगर ते पंढरपूर या पालखी सोहळ्यात निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या पाटील यांच्या कार्याची दखल घेत संत मुक्ताई संस्थानने या गौरवपूर्ण पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे.संस्थानच्या वतीने दरवर्षी या “वारकरी भुषण वै. प्रल्हादराव एकनाथराव पाटील आदर्श वारकरी पुरस्काराने निष्ठावान व सेवा भावी वारकऱ्याची निवड करून त्यांना गौरविण्यात येते. 

वारकरी संप्रदायामध्ये उल्लेखनीय सेवा

पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या साधकांसाठी दरवर्षी दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार यंदा कैलास पाटील यांना प्रदान केला जाणार आहे. कैलास पाटील हे केवळ एक वारकरी म्हणून नव्हे, तर संप्रदायाचा वसा आणि व्रत निष्ठेने जोपासणारे एक आदर्श साधक म्हणून ओळखले जातात. संत मुक्ताईच्या पालखी सोहळ्यात गेली आठ वर्षे ते मुक्ताईनगर ते पंढरपूर आणि परतीच्या प्रवासात दोन्ही बाजूंनी अखंडपणे चालतात. केवळ चालणे इतकेच नाही, तर हरिपाठ, काकडा आरती, भजने आणि संत मुक्ताई मठातील विविध धार्मिक तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांची सक्रिय आणि सदैव हजेरी असते. त्यांच्या कार्याचा आवाका केवळ वारीपुरता मर्यादित नसून, एक साधक म्हणून त्यांनी संप्रदायाचा जो प्रवास मांडला आहे, तो अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

कुटुंबाला संत मुक्ताई निष्ठेचा गौरवशाली वारसा 

पाटील यांच्या या निवडीमागे एक गौरवशाली वारसा आहे. गुर्जर समाजातील असलेल्या कैलास पाटील यांच्या कुटुंबात १७ व्या शतकापासून वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. गोविंद महाराज उत्रानकर यांच्या परंपरेत त्यांचे कुटुंबीय पिढ्यानपिढ्या मुक्ताईच्या वारीत कार्यरत आहेत. वडिलांकडून मिळालेला हा वारसा कैलास पाटील यांनी अत्यंत जिवंत ठेवला आहे. पुरस्कार निवडीसाठी संस्थानने अत्यंत कडक निकष लावले होते. यात दोन्ही बाजूंनी पूर्ण वारीत सहभागी होणे, घरदार सोडून दोन महिने पालखी सोहळ्यातील उपक्रमांमध्ये सक्रिय राहणे, पहाटे सर्वात आधी उठून रात्री उशिरापर्यंत सेवा करणे आणि चारित्र्यसंपन्न असणे अशा विविध पैलूंवर कैलास पाटील हे तंतोतंत उतरले आहेत. त्यांच्या या दीर्घकालीन आणि निस्वार्थ सेवेची दखल घेऊनच त्यांची सर्वसंमतीने या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

पुरस्काराचे स्वरूप असे 

या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे स्वरूप अकरा हजार रुपये रोख, पाच वस्त्रे आणि सन्मानपत्र असे आहे. येत्या १८ ऑगस्ट रोजी संत मुक्ताई पालखी आगमन सोहळ्याच्या प्रसंगी, संत मुक्ताई दरबारात हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने आणि संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. कैलास पाटील यांच्या निवडीमुळे मुक्ताईनगर परिसरात आणि वारकरी वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या मानाच्या पुरस्काराची अधिकृत माहिती संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे प्रमुख रवींद्र हरणे महाराज यांनी दैनिक, मुक्ताई दूत शी बोलतांना दिली असून, ही निवड म्हणजे खऱ्या अर्थाने निस्वार्थ भक्तीचा आणि कष्टाचा गौरव असल्याचे वारकरी संप्रदायातून बोलले जात आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subcribe Youtube

Subcribe Now

Leave a Comment

error: Content is protected !!