उपनगराध्यक्षा देवयानी शिरसाट यांच्या समयसूचकतेने मोठा अनर्थ टळला!
मुक्ताई मंदिरासमोरील शेताला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे वारकरी, ऑईल मिल व जिनिंग प्रेसिंग फॅक्टर सुरक्षित
मुक्ताईनगर (प्रतिनिधी):
शहरातील बोदवड रोडवरील आदिशक्ती श्री संत मुक्ताई मंदिरासमोर असलेल्या शेतात अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत शेतकरी सतीश निकम यांच्या शेतातील ऊस व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले, तरी उपनगराध्यक्षा सौ. देवयानी शिरसाट यांच्या समयसूचकतेमुळे पुढील होणारा एक मोठा अनर्थ टळला आहे.
नेमकी घटना काय?
भरदुपारी रणरणत्या उन्हात सतीश निकम यांच्या शेतात आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीची तीव्रता एवढी होती की, शेजारीच असलेल्या ऑईल मिल आणि जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीला तिचा मोठा धोका निर्माण झाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून शेतकरी निकम यांनी तात्काळ माजी नगरसेवक निलेश शिरसाठ यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.
प्रशासकीय हालचाली आणि बचावकार्य:
माहिती मिळताच उपनगराध्यक्षा देवयानी शिरसाट यांनी क्षणाचाही विलंब न लावता मुख्याधिकारी पुदाके यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. मुक्ताईनगर पालिकेच्या यंत्रणेसह वरणगाव आणि बोदवड येथून तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या.
वारकऱ्यांना दिलासा:
सध्या आईसाहेब मुक्ताई यांचा अंतर्धान सोहळा सुरू असल्याने मंदिर परिसरात मोठ्या संख्येने वारकरी मुक्कामाला आहेत. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने या वारकरी भाविकांना मोठा दिलासा मिळाला.
लोकप्रतिनिधींची घटनास्थळी धाव:
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतः उपनगराध्यक्षांसह माजी नगरसेवक निलेश शिरसाठ, माजी नगरसेवक मुकेशचंद्र वानखेडे, विद्यमान नगरसेवक संतोष कोळी यांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने व अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. लोकप्रतिनिधींच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.






