पळासखेडेत पोलीस बंदोबस्तात ठराव मंजूर
जिल्हा बँक निवडणुकीवरून विकासोमध्ये वादळी चर्चा; प्रेमराज पवार यांच्या नावाची बहुमताने निवड
जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पळासखेडे रुपनगर विकासोमध्ये मतदानाच्या अधिकारावरून रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर, पोलीस बंदोबस्तात झालेल्या बैठकीत १३ विरुद्ध ७ अशा बहुमताने प्रेमराज सूर्यभान पवार यांच्या नावाचा ठराव मंजूर करण्यात आला.
भडगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने विविध कार्यकारी सोसायटीमार्फत मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी पळासखेडे रुपनगर विकासोमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मोठी रस्सीखेच सुरू होती.
संस्थेची कर्ज वसुली १०० टक्के नसल्याने निवडून आलेल्या सभासदांना मतदानाचा ठराव करण्याचा अधिकार काढून घेण्यात आला होता. त्यामुळे नियमानुसार नियमित कर्जफेड करणाऱ्या सभासदाच्या नावाचा ठराव करणे आवश्यक होते. या ठरावावरून विकासोच्या सदस्यांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले होते. वाद टाळण्यासाठी व खबरदारी म्हणून काही सदस्य सहलीला गेल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अखेर आज आयोजित वादळी सभेत विकासोतील १३ पैकी १२ सदस्य हजर होते. कडक पोलीस बंदोबस्तात पार पडलेल्या या बैठकीत नियमित कर्जफेड करणारे सभासद प्रेमराज सूर्यभान पवार यांच्या नावाची मतदानाच्या अधिकारासाठी निवड करण्यात आली. संस्थेचे सचिव संतोष चंदले यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले, तर शिपाई लक्ष्मण पाटील यांनी सहकार्य केले. भडगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.
नेमके प्रकरण काय?
जिल्हा बँक निवडणुकीसाठी विकासोची कर्ज वसुली शंभर टक्के नसल्याने नियमित कर्जदार सभासदाचा ठराव करणे बंधनकारक होते. यावरून सदस्यांमध्ये रस्सीखेच सुरू होऊन काही सदस्य सहलीला गेल्याने गावात राजकीय तणाव निर्माण झाला होता.
चोख पोलीस बंदोबस्त
गावातील राजकीय तणाव आणि सभेतील वादळी चर्चा पाहता भडगाव पोलीस ठाण्याच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने परिस्थिती नियंत्रणात ठेवून प्रक्रिया पार पाडली.
यांची होती उपस्थिती:
प्रमोद कृष्णा पाटील (चेअरमन), शरद पाटील (संचालक), ज्ञानेश्वर राजपूत (संचालक), ताराचंद पवार (संचालक), पांडुरंग जाधव (संचालक), धनंजय पवार (संचालक), संगीताबाई पाटील (संचालक), सखुबाई पाटील (संचालक), दिपक मोरे (संचालक), राहुल पाटील (संचालक), हरी वंजारी (संचालक), संतोष चंदले (सचिव), लक्ष्मण पाटील (शिपाई), सुशील सोनवणे (पोलीस उपनिरीक्षक), प्रदीप परदेशी (पोलीस कॉन्स्टेबल), संजय पाटील (पोलीस कॉन्स्टेबल), सुनील राजपूत (पोलीस कॉन्स्टेबल), दिपक पाटील (पोलीस कॉन्स्टेबल), सोनी सपकाळे (पोलीस कॉन्स्टेबल), समाधान देशमुख (होमगार्ड), अजय पाटील (होमगार्ड), किशोर पाटील (होमगार्ड), रवींद्र महाजन (होमगार्ड), शरद काळे (होमगार्ड), युवराज राठोड (होमगार्ड), ज्ञानेश्वर कोळी (पोलीस पाटील)






