हतनूर धरणातून वाहून जाणारे लाखो लिटर अतिरिक्त पाणी ओझरखेडा धरणात सोडण्याची आमदार चंद्रकांत पाटलांची मागणी!

मुक्ताईनगर : जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या समाधानकारक आणि जोरदार पावसामुळे धरणात पाण्याचा मोठा भरमसाठ साठा उपलब्ध झाला असून, सध्या धरणाची पाणीपातळी अत्यंत समाधानकारक स्थितीवर पोहोचली आहे. सद्यस्थितीत धरणात वाढलेला अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरळीतपणे करण्यासाठी प्रशासनाला धरणाचे अनेक दरवाजे उघडावे लागले आहेत. अशा परिस्थितीत, धरणातले अन्यत्र वाहून जाणारे हे लाखो लिटर अतिरिक्त पाणी वाया जाऊ न देता त्याचा अतिशय योग्य व परिणामकारक उपयोग करण्याच्या दृष्टीने, हतनूर धरणातून वाहून जाणारे हे अतिरिक्त पाणी तातडीने भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा धरणामध्ये (लेफ्ट करण्यात यावे) वळवण्यात यावे, अशी जनहिताची मागणी आ. चंद्रकांत पाटील यांनी लेखी पत्रद्वारे केली आहे.
या संदर्भात तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या जळगाव येथील मुख्य अभियंत्यांना अधिकृत मागणी पत्र आमदारांच्या वतीने पाठवण्यात आले असून, या महत्त्वाच्या विषयावर त्वरित पावले उचलण्याची आग्रही विनंती या पत्रात करण्यात आली आहे. हतनूर धरणातून ओझरखेडा धरणात पाणी सोडल्यास केवळ ओझरखेडा धरणातील खालावलेला पाणीसाठा झपाट्याने वाढण्यास मदत होईल असे नाही, तर या परिसरातील शेकडो एकर शेतीला सिंचनासाठी आवश्यक असणारा पाण्याचा निरंतर पुरवठा उपलब्ध होईल. आगामी खरीप हंगाम तसेच पुढील सर्वच शेती हंगामांसाठी हा अतिरिक्त पाणीसाठा परिसरातील बळीराजासाठी एक मोठा व दिलासादायक वरदान ठरणार आहे.
पावसाळ्यात धरणातून विसर्ग होणारे अतिरिक्त पाणी कोणत्याही नियोजनाशिवाय वाया जाण्याऐवजी जलसंधारणाच्या दृष्टीने अशा प्रकारे स्थानिक जलस्रोतांमध्ये व धरणांमध्ये साठवणे हा अत्यंत दूरगामी व फायदेशीर निर्णय ठरेल, असा सखोल विश्वास शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत असून आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या मागणीमुळे ओझरखेडा पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.






