होम मुक्ताई दूत जळगाव देश – विदेश महाराष्ट्र राजकीय खेळ व्हायरल लाइफस्टाइल मनोरंजन E-Paper
Breaking

कामगारांवर ओढवले ‘स्वतःची कबर स्वतःच खोदण्याचे’ संकट; भारतात रोबोट्सना ट्रेनिंग देण्यासाठी कामगारांचाच वापर

कामगारांवर ओढवले ‘स्वतःची कबर स्वतःच खोदण्याचे’ संकट; भारतात रोबोट्सना ट्रेनिंग देण्यासाठी कामगारांचाच वापर

विशेष प्रतिनिधी, नागपूर/चेन्नई तंत्रज्ञानाच्या जगात सध्या ‘एआय’ (AI) आणि रोबोटिक्सची मोठी क्रांती होत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याच क्रांतीच्या नावाखाली भारतासारख्या विकसनशील देशांमधील गरीब कामगारांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. नागपूर आणि तामिळनाडूतील कापड कारखान्यांमध्ये सध्या एक अस्वस्थ करणारा प्रयोग सुरू आहे, जिथे कामगार नकळतपणे भविष्यात आपलीच जागा घेणाऱ्या रोबोट्सना प्रशिक्षण देत आहेत.

काय आहे हा संपूर्ण प्रकार?

द इंडियन एक्सप्रेसच्या (The Indian Express) वृत्तानुसार, नागपूरमधील एका कापड कारखान्यात काम करणारे ३० वर्षीय तंत्रज्ञ आशिष नारायण दररोज कामावर आल्यावर आपल्या कपाळावर एक लहान रेकॉर्डिंग डिव्हाइस (कॅमेरा) लावतात. ते मशीनची दुरुस्ती कशी करतात, धागा न तुटता हाताचा दाब कसा नियंत्रित करतात, या त्यांच्या प्रत्येक हालचालीची नोंद हा कॅमेरा तासनतास करत राहतो.

दुसरीकडे, तामिळनाडूतील एका कारखान्यात महिला कामगारांना ‘मेटा’ (Meta) कंपनीचे स्मार्ट ग्लासेस घालून पॅकिंगचे काम करण्यास सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेला तंत्रज्ञानाच्या भाषेत ‘इगोसेंट्रिक डेटा’ (Egocentric Data) संकलन म्हटले जाते. म्हणजेच, मानवी डोळ्यांच्या आणि हातांच्या हुबेहूब हालचाली कॅमेऱ्यात कैद करून तो डेटा रोबोट्सना शिकवण्यासाठी वापरला जात आहे.


कामगारांची हतबलता: “स्वतःची कबर स्वतःच खोदण्यासारखे…”

या प्रयोगात सहभागी असलेले आशिष नारायण यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की,

“मला हे काम म्हणजे स्वतःची कबर स्वतःच खोदण्यासारखे आणि स्वतःचीच शवपेटी बनवण्यासारखे वाटते आहे. हे रेकॉर्डिंग भविष्यात माझी नोकरी हिरावून घेणार, याची मला पूर्ण जाणीव आहे.”

कारखाना प्रशासनाकडून कामगारांना केवळ “काम सुधारण्यासाठी” ही उपकरणे दिली जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, हा डेटा पुढे अब्जावधी रुपयांना रोबोटिक्स कंपन्यांना विकला जात आहे आणि त्याचा अंतिम उद्देश मानवी कामगारांना बदलणे हाच आहे, याबद्दल कामगारांना अंधारात ठेवले जात आहे.


रोबोट्सना मानवी ‘मसल मेमरी’ची गरज का?

आज रोबोट्स कॉम्प्युटरवर कठीण आकडेमोड करू शकतात, मात्र प्रत्यक्ष जमिनीवर काम करताना त्यांना मानवी स्पर्शाची नाजूकपणा समजत नाही. कापड हाताळणे, योग्य दाबाने नट-बोल्ट फिट करणे किंवा नाजूक वस्तूंची पॅकिंग करणे यासाठी लागणारी ‘मसल मेमरी’ (Muscle Memory) रोबोट्सना शिकवण्यासाठी भारतीय कामगारांचा हा डेटा अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. एका अहवालानुसार, पुढील २ ते ३ वर्षांत जागतिक रोबोटिक्स कंपन्यांना अशा प्रकारच्या १० कोटी ते १०० कोटी तासांच्या डेटाची गरज आहे, आणि यासाठी भारताला सर्वात मोठा स्त्रोत बनवले जात आहे.

डेटा कंपन्यांचा दावा आणि नैतिक प्रश्न

हा डेटा गोळा करणाऱ्या ‘ऑब्जेक्टवेज’ (Objectways) सारख्या कंपन्यांचे म्हणणे आहे की, ते कामगारांना प्रति तास २५० ते ३५० रुपये मानधन देतात. “ज्या ठिकाणी माणसांना काम करणे आवडत नाही किंवा जेथे धोके आहेत, तिथे हे रोबोट्स काम करतील,” असा युक्तिवाद या कंपन्या करत आहेत.

मात्र, यातून निर्माण होणारा नैतिक प्रश्न अत्यंत गंभीर आहे. कोणत्याही भक्कम रोजगाराच्या सुरक्षेशिवाय आणि पर्यायी व्यवस्था नसताना, भारतातील गरीब आणि मध्यमवर्गीय कामगारांना त्यांच्याच अनुभवाचा आणि कौशल्याचा वापर करून बेरोजगार केले जात आहे, हे या घटनेवरून स्पष्ट होते. भविष्यातील हे ‘ऑटोमेशन’ कामगारांचे जगणे सुसह्य करेल की त्यांना गरिबीच्या खाईत लोटेल, हा आता मोठा प्रश्न बनला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subcribe Youtube

Subcribe Now

Leave a Comment

error: Content is protected !!