शहादा ( प्रतिनिधी ) – ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाला संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र, सेवा केंद्रांच्या कॉमन ब्रँडिंगमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अन्य राजकीय व्यक्तींची छायाचित्रे वापरण्यात आल्यास व्यवहार्य अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
विशेषतः निवडणूक काळातील आचारसंहिता, राजकीय बंद अथवा अन्य संवेदनशील परिस्थितीत राजकीय व्यक्तींची छायाचित्रे असल्यामुळे सेवा केंद्रे अनावश्यकपणे राजकीय दृष्टिकोनातून चर्चेत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय व्यक्तींची छायाचित्रे नसलेले शासकीय कॉमन ब्रँडिंग सेवा केंद्रांवर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.
सेवा केंद्रांची ओळख ही केवळ शासकीय सेवा देणारे केंद्र म्हणून असावी. तसेच आचारसंहिता अथवा राजकीयदृष्ट्या संवेदनशील कालावधीत सेवा केंद्र चालकांना कोणत्याही प्रकारच्या अनावश्यक अडचणी निर्माण होऊ नयेत, याबाबत प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या मागणीचे निवेदन संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी आशा संगवी यांनी निवेदन स्वीकारले.
निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश ढोडरे , जुनेद मन्यार, राजूशहा, फरीद बेलदार, अजीम पटवे, खालिद शेख यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
संघटनेने प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून राजकीय छायाचित्रविरहित कॉमन ब्रँडिंग उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.







