हरताळे, सारोळा व दुई उपकेंद्रांचा वीज प्रश्न सुटणार; नवीन वाढीव 5 MVA ट्रान्सफॉर्मरसाठी आ.चंद्रकांत पाटलांची मागणी
मुक्ताईनगर (प्रतिनिधी): मुक्ताईनगर मतदारसंघातील शेतकरी आणि ग्रामस्थांना भेडसावणारी विजेची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील सरसावले आहेत. मतदारसंघातील अतिभारित असलेल्या हरताळे, सारोळा व दुई या विज उपकेंद्रांवरील भार कमी करण्यासाठी चांगदेव, निमखेडी बु आणि नायगाव येथे वाढीव 5 MVA क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर मंजूर करावेत, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी याबाबत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे सविस्तर मागणी केली आहे.
पिकांचे नुकसान टळणार
सद्यस्थितीत हरताळे, सारोळा व दुई या उपकेंद्रांवर परिसरातील गावांचा आणि शेती शिवाराचा मोठा भार आहे. क्षमतेपेक्षा जास्त भार असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. याचा सर्वाधिक फटका शेती पिकांना बसत असून, पाणी असूनही वेळेवर सिंचन करता येत नसल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. गावठाण परिसरातील नागरिकांनाही या ‘विजेच्या लपंडावा’मुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
प्रस्तावित नवीन क्षमता
या परिस्थितीचा सारासार विचार करून, आमदार पाटील यांनी ही समस्या तातडीने मार्गी लावण्याची विनंती केली आहे. प्रस्तावित चांगदेव, निमखेडी बु. आणि नायगाव येथे नवीन ५ MVA ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाल्यास मूळ उपकेंद्रांवरील भार विभागला जाईल. परिणामी, संपूर्ण परिसराला उच्च दाबाने आणि अखंडित वीज पुरवठा मिळणे सुलभ होणार आहे. या मागणीमुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.






