संत मुक्ताई समाधी मंदिराच्या मार्गावर भव्य प्रवेशद्वार उभारा -लक्ष्मण सापधरे
दि.१८ ऑगस्ट रोजी पालखीचे आगमन होणार असून यापूर्वी भूमीपूजनाची आस!
मुक्ताईनगर | प्रतिनिधी
भुसावळ रोड–जुने कोथळी मुक्ताई मंदिर मार्गावर भव्य प्रवेशद्वार उभारण्याची मागणी तीव्र; पालखी आगमनापूर्वी भूमीपूजनाची भाविकांची अपेक्षा
आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पावन पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदाय व नागरिकांचा प्रशासनाकडे एल्गार
आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पावन चरणांनी पवित्र झालेल्या आणि जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुक्ताईनगर शहरात धार्मिक व सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या एका महत्त्वाच्या मागणीने जोर धरला आहे. शहरातील भुसावळ रोडवरून जुने कोथळी येथील आदिशक्ती संत मुक्ताई मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर एक भव्य आणि आकर्षक ‘आदिशक्ती संत मुक्ताई मंदिर प्रवेशद्वार (कमान)’ लवकरात लवकर उभारण्यात यावी, अशी आग्रही मागणी लक्ष्मण रमेश सापधरे यांच्या नेतृत्वाखाली समस्त भाविक भक्त, वारकरी संप्रदाय व नागरिकांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या नगरपंचायतीमार्फत शहराच्या सौंदर्यीकरणात भर देण्यासाठी विविध भागांमध्ये आकर्षक प्रवेशद्वारे उभारण्याचे कौतुकास्पद कार्य सुरू आहे. मात्र, या विकासाच्या प्रवाहात जगभरातून आणि देशभरातून दाखल होणाऱ्या भाविकांच्या ओघाचा विचार करता, थेट संत मुक्ताई समाधी स्थळ श्री क्षेत्र कोथळी मंदिराकडे नेणाऱ्या या मुख्य मार्गावर प्रवेशद्वार असणे अत्यंत आवश्यक व अपरिहार्य असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रवेशद्वारामुळे केवळ तिर्थक्षेत्राचे धार्मिक वैभव अधिक वृद्धिंगत होईलच, शिवाय मुक्ताईनगर नगरीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक भाविकाचे अतिशय भव्य व दिव्य स्वागत होईल, अशी भावना वारकरी वर्तुळातून व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, आगामी काळात पंढरपूर येथून पांडुरंग परमात्म्याचे पवित्र दर्शन घेऊन आदिशक्ती संत मुक्ताईंची पावन पालखी येत्या दिनांक १८ रोजी मुक्ताईनगर येथे मोठ्या उत्साहात आणि सोहळ्यात आगमन करणार आहे. या ऐतिहासिक, पवित्र आणि आनंददायी प्रसंगाचे औचित्य साधून याच पालखी आगमनाच्या पूर्वसंध्येला किंवा याच पवित्र पर्वावर प्रवेशद्वार उभारणीच्या कामाचा शुभारंभ व भूमीपूजन व्हावे, अशी तीव्र व उत्कट इच्छा समस्त वारकरी संप्रदाय व भाविकांनी व्यक्त केली आहे. हा क्षण वारकऱ्यांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि चिरस्मरणीय ठरेल, यात शंका नाही.
सदर जनहितार्थ मागणीला तातडीने प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात यावी आणि भुसावळ रोड ते जुने कोथळी मुक्ताई मंदिर मार्गावरील मुक्ताई झेरॉक्सलगतच्या योग्य व सुटसुटीत ठिकाणी या भव्य प्रवेशद्वाराचे बांधकाम त्वरित हाती घ्यावे, अशी साद निवेदनाद्वारे घालण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निवेदनाच्या प्रती केवळ स्थानिक प्रशासनापुरत्या मर्यादित न ठेवता, जिल्हाधिकारी जळगाव, मुख्यमंत्री कार्यालय (CMO) महाराष्ट्र शासन तसेच नगर विकास संचालनालयाकडेही अत्यंत गांभीर्याने पाठविण्यात आल्या आहेत. धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या लोकभावनेच्या मागणीला शासन व प्रशासन स्तरावरून तातडीने सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी ठाम अपेक्षा संपूर्ण मुक्ताईनगर परिसर व वारकरी संप्रदायाकडून व्यक्त केली जात आहे.







