लाचखोर ‘त्रिकूट’ एसीबीच्या जाळ्यात!
भुसावळात ३० हजारांची लाच घेताना कारवाई; सहायक अधिकारी व दोन लेखापरीक्षक ताब्यात
भुसावळ (प्रतिनिधी):
सावकारी परवाना काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहायक सहकार अधिकारी व दोन लेखापरीक्षकांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी (दि. १५) रंगेहात पकडले. या धडक कारवाईमुळे सहकार वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
विनय गरुड (सहायक सहकार अधिकारी, रा. धुळे), सुरेश विसपुते (वय ६२, लेखापरीक्षक, रा. भुसावळ) व हेमंत प्रकाश काळे (वय ४९, लेखापरीक्षक, रा. जळगाव) अशी लाचखोर संशयितांची नावे आहेत.
थोडक्यात वृत्त:
लाचेची रक्कम: ३०,००० रुपये
कारण: सावकारी परवाना मंजूर करणे
ठिकाण: नाहाटा चौफुली, भुसावळ
नाहाटा चौफुलीवर कारवाई
भुसावळ येथील सहायक निबंधक कार्यालयात तक्रारदाराने सावकारी परवान्यासाठी अर्ज केला होता. हा परवाना देण्यासाठी संशयित तिघांनी ३० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने या प्रकरणी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली.
सोमवारी एसीबीच्या पथकाने कार्यालयात सापळा रचला होता. मात्र, संशयितांनी तक्रारदाराला नाहाटा चौफुली येथे पैसे घेऊन बोलावले. तेथे लाचेची रक्कम स्वीकारताना तिघांनाही पथकाने रंगेहात पकडले.
धुळ्याला पथक रवाना
कारवाईनंतर दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, तिसऱ्या संशयिताला ताब्यात घेण्यासाठी एसीबीचे एक पथक धुळे येथे रवाना झाले आहे. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.






