होम मुक्ताई दूत जळगाव देश – विदेश महाराष्ट्र राजकीय खेळ व्हायरल लाइफस्टाइल मनोरंजन E-Paper
Breaking

परवान्याविना खत विक्री; गुजरातच्या कंपनीवर जळगावात गुन्हा

Follow Us:

परवान्याविना खत विक्री; गुजरातच्या कंपनीवर जळगावात गुन्हा

व्हॉट्सॲप अन् क्यूआर कोडद्वारे शेतकऱ्यांना ऑनलाईन विक्री; कृषी विभागाने डमी गिऱ्हाईक पाठवून केला भांडाफोड

महाराष्ट्रात कोणताही वैध परवाना नसताना व्हॉट्सॲप व कुरिअरच्या माध्यमातून खते आणि कीटकनाशकांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या गुजरातमधील ‘सिडनी फॉर्म्युलेशन अँड केमिकल्स’ या कंपनीवर जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाने सापळा रचून या अवैध कारभाराचा पर्दाफाश केला.

गुजरातस्थित ‘सिडनी फॉर्म्युलेशन अँड केमिकल्स’ या कंपनीकडे महाराष्ट्रात खत आणि कीटकनाशके विकण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही शासकीय परवानगी किंवा परवाना नव्हता. तरीदेखील आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करत व्हॉट्सॲप, क्यूआर कोड आणि खाजगी ट्रान्सपोर्ट किंवा कुरिअरच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट खते व कीटकनाशके विकली जात होती.

कृषी विभागाला या अवैध कारभाराची गुप्त माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कारवाईचे नियोजन केले. संशय बळावल्यानंतर कृषी विभागाने एका तोतया ग्राहकाच्या माध्यमातून या कंपनीकडे १८ हजार २० रुपयांच्या विविध खत व कीटकनाशकांची ऑनलाईन ऑर्डर नोंदवली.

कंपनीने ऑनलाईन रक्कम स्वीकारून ट्रान्सपोर्टद्वारे पार्सल जळगावात पाठवले. हे पार्सल ताब्यात घेतले असता त्यात ९ विविध प्रकारची उत्पादने आढळून आली. कृषी विभागाने या सर्व उत्पादनांचे नमुने तात्काळ जप्त करून पुढील रासायनिक तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

या प्रकरणी कृषी विभागाच्या बियाणे, खत व कीटकनाशक निरीक्षकांच्या फिर्यादीवरून जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्यानुसार कंपनीचे प्रतिनिधी जयेश पटेल, जबाबदार व्यक्ती विनोद एन. रानपरिया यांच्यासह इतर संबंधितांविरुद्ध खत नियंत्रण आदेश, कीटकनाशक अधिनियम, अत्यावश्यक वस्तू अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 नेमकं प्रकरण काय?

गुजरात येथील एका कंपनीने महाराष्ट्रात कोणताही परवाना नसताना ऑनलाईन माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते व कीटकनाशकांची थेट विक्री सुरू केली होती. कृषी विभागाने गोपनीय माहितीच्या आधारे डमी ग्राहक बनून ऑर्डर दिली आणि पार्सल जळगावात येताच १८ हजार २० रुपयांचा मुद्देमाल व ९ उत्पादने जप्त करून या बेकायदेशीर विक्रीचा भांडाफोड केला.

संशयितांवर कायदेशीर कारवाई

या अवैध विक्रीप्रकरणी कृषी विभागाच्या निरीक्षकांच्या तक्रारीवरून जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीचे प्रतिनिधी जयेश पटेल व जबाबदार व्यक्ती विनोद एन. रानपरिया यांच्यासह संबंधितांवर खत नियंत्रण आदेश, कीटकनाशक कायदा, अत्यावश्यक वस्तू अधिनियम व भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हे नोंदवून जप्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subcribe Youtube

Subcribe Now

Leave a Comment

error: Content is protected !!