धावत्या रेल्वेसमोर झोकून देत विद्यार्थिनीने संपविले जीवन
जळगाव – धावत्या रेल्वेसमोर झोकून देत महाविद्यालयीन विद्यार्थिनीने जीवन संपविले. कशिश भिकारी तडवी (वय २१, रा. श्यामनगर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १४) गिरणा पंपिंग रस्त्याजवळील रेल्वे रूळावर घडली.
शहरातील एका महाविद्यालयात औषधशास्त्र विद्याशाखेच्या (बी.फार्मसी) तृतीय वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या कशीश तडवी हिची चार दिवसांपूर्वी परीक्षा आटोपली होती. रविवारी सकाळी उठल्यावर तिने ब्रश केला अन् मागच्या दाराने घराबाहेर गेली. कुटुंबीयांना वाटले, शेजारी गेली असावी.
इतक्यात शेजारी व परिसरातील तरुणांनी कशीश रेल्वे रूळाकडे गेल्याचे घरी येऊन सांगितले. कुटुंबीयांनी धाव घेतली, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तिने धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केली.
कॉलनीतील नागरिकांनी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.






