नेपाळमध्ये महाप्रलय! ३५९ जणांचा मृत्यू, ३० हून अधिक देशांतील नागरिक बेपत्ता
तिबेटमध्ये हिमनदी फुटल्याने चीन-नेपाळ सीमेवर भीषण पूर; १,५०० हून अधिक जण गायब, लष्कर आणि पोलिसांकडून बचावकार्य वेगात
तिबेटमध्ये हिमनदी फुटून आलेल्या भीषण महापुराने नेपाळ आणि चीनच्या सीमाभागात मोठा विध्वंस घडवून आणला आहे. ३६ तासांनंतरही परिस्थिती अत्यंत गंभीर असून आतापर्यंत ३५९ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक बेपत्ता आहेत.
तिबेटमधील हिमनदी बुधवारी फुटल्यानंतर चीन आणि नेपाळच्या सीमावर्ती भागात महापूर व ढिगाऱ्यांमुळे मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पोलीस, लष्कर आणि इतर मदत यंत्रणा युद्धपातळीवर बचावकार्य राबवत आहेत. रसुवा, नुवाकोट, धाडिंग, चितवन, गोर्खा, तनहुन आणि नवलपरासी परिसरातून शेकडो मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
या महाप्रलयाचा फटका केवळ स्थानिक नागरिकांनाच नाही, तर जगभरातील पर्यटकांनाही बसला आहे. नेपाळ पर्यटन मंडळाच्या माहितीनुसार, बेपत्ता झालेल्यांमध्ये ट्रेकिंगसाठी आणि धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी आलेल्या ३० हून अधिक देशांतील विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. अमेरिका, मलेशिया, युक्रेन, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा, सिंगापूर, जर्मनी आणि रशियासह अनेक देशांचे नागरिक सध्या संपर्काबाहेर आहेत.
नेमकं प्रकरण काय?
तिबेटमध्ये हिमनदी फुटल्याने आलेल्या पुरामुळे चीन आणि नेपाळ सीमाभागात हाहाकार माजला आहे. ३५९ हून अधिक लोकांचा बळी गेला असून १,५०० हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. या आपत्तीत स्थानिक नागरिकांसह जगातील ३० पेक्षा जास्त देशांतील शेकडो पर्यटक अडकले असून लष्कराकडून मदतकार्य सुरू आहे.
विदेशी नागरिक आणि भारतीयांची स्थिती
नेपाळ पर्यटन मंडळ व विविध देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांनुसार ५१७ विदेशी पर्यटक बेपत्ता आहेत. यामध्ये अमेरिकेचे ६५, मलेशियाचे ५१ आणि युक्रेनचे ५३ नागरिक समाविष्ट आहेत. तसेच या प्रलयात भारतातील २८८ नागरिक अडकले असून यात महाराष्ट्रातील ८० जणांचा समावेश आहे. राज्य सरकारने यांच्या मदतीसाठी हेल्पलाइन सुरू केली आहे.








