केळी उत्पादकांसाठी दिलासादायक पाऊल; मुक्ताईनगरच्या ‘एर्विनिया’ रोगावर शासनाचे वेधले लक्ष; आ. चंद्रकांत पाटलांची महसूल मंत्र्यांसोबत उच्चस्तरीय चर्चा
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या गंभीर ‘एर्विनिया’ (Erwinia) जीवाणूजन्य रोगाच्या समस्येवर तातडीने मार्ग काढण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी मंत्रालयात सविस्तर चर्चा केली आहे. मल्चिंग पेपरचा वापर करून घेतल्या जाणाऱ्या केळी पिकावर या रोगाचे मोठे संकट ओढवले असून, यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. या गंभीर प्रकारची तातडीने दखल घेत शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.
सध्या अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मल्चिंग पेपरच्या माध्यमातून केळी लागवड करत आहेत. मात्र, या पिकामध्ये ‘एर्विनिया’ या जीवघेण्या जिवाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे केळीच्या झाडांच्या मुळाकडील भाग आणि खोड कुजण्याचे प्रकार वेगाने घडत आहेत. या प्रादुर्भावामुळे झाडे कमकुवत होऊन पाने वाकणे आणि ऐन मोसमात झाडे जमिनीवर कोसळणे (टिप-ओव्हर) अशा समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. परिणामी, हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या रोगाचा तातडीने शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणे गरजेचे असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केले. तसेच, कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या रोगाचा बिमोड करण्यासाठी ठोस उपाययोजना तातडीने उपयोगात आणून बाधित शेतकऱ्यांना योग्य ती शासकीय मदत व अनुदान उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.
अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज व्हावे आणि त्यांच्या पिकाचे झालेले नुकसान रोखता यावे, यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी या प्रश्नावर सातत्यपूर्ण पाठपुरावा चालवला असून, लवकरच यावर शासनाकडून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. या उच्चस्तरीय पाठपुराव्यामुळे मुक्ताईनगर मतदारसंघातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
यावेळी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार नंदकिशोर महाजन, जिल्हाधिकारी रोहन घुगे आदिन्सह केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






